डिटेक्टिव्ह रॉबर्ट
हंटरला त्याच्या मोबाईलवर कॉल येतो. समोरचा आवाज हंटरला सुपरिचित असला तरी त्या
आवाजाशी निगडित असलेल्या त्याच्या आठवणी फार भयंकर असतात. कारण तो आवाज कृत्रिम
असतो. मशिनमधून येणाऱ्या निर्जीव आवाजासारखा असतो. हंटर आपला पार्टनर डिटेक्टिव्ह
कार्लोस गार्सिया याला शेवटचा कधी भेटला होता अशी विचारणा या कृत्रिम आवाजाकडून
केली जाते. हंटरच्या पायाखालची जमीनच सरकते! गार्सिया जिवंत राहायला हवा असेल तर
त्यासाठी अत्यंत कठीण अशी काही कोडी सोडवून अशक्य आव्हानांचा सामना करण्याची
कामगिरी हंटरवर सोपवली जाते. ही कामगिरी काही ठराविक कालावधीतच पार पाडण्याची अटही
घालण्यात आलेली असते. भयंकर विचित्र अशी ही आव्हानं पार करत हंटर जेव्हा त्या
विवक्षित स्थळी पोचतो त्यावेळी गार्सिया अतिशय भयंकर परिस्थितीत कैद केलेल्या
अवस्थेत असल्याचं हंटरला दिसतं. सुरुवातीलाच सांगितलेल्या अटीप्रमाणे गार्सियाची
सुटका करण्यासाठी हंटरकडे केवळ एक मिनिट उरलेला असतो.
---------------
तीन-चार महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या एका समूहावर ख्रिस कार्टरच्या डिटेक्टिव्ह रॉबर्ट हंटरच्या मालिकेशी माझी पहिली ओळख झाली. जवळपास प्रत्येकजण या मालिकेचं आणि कार्टरच्या लेखनाचं तोंडभरून कौतुक करत होता. Goodreads वरही या मालिकेला भरभरून स्टार्स मिळालेले होते. त्यावेळी मी Jussi Adler-Olsen या डॅनिश लेखकाच्या Department Q Series मधल्या पहिल्या पुस्तकाच्या ४०% च्या आसपास होतो. हंटर आणि कार्टरचं एवढं कौतुक वाचल्याने साहजिकच उत्सुकतेपोटी मी The Crucifix Killer हे त्या मालिकेतलं पहिलं पुस्तक चाळून बघण्याचं ठरवलं. (हे पुस्तक किंडल अनलिमिटेडवर उपलब्ध आहे)
पहिल्या प्रकरणाची वर दिलेली सुरुवात वाचून मी अक्षरशः थक्कच होऊन गेलो होतो. पहिल्या दोन प्रकरणांचा वेग, धक्कातंत्र, संवाद, पात्रांचा वावर हे सगळंच एवढं भन्नाट होतं की ते पुस्तक मला खाली ठेववेच ना! पण तरीही कुठलंही पुस्तक शक्यतो अर्धवट सोडून देत नसल्याने एक प्रकरण The Crucifix Killer मधलं आणि एक प्रकरण Department Q Series मधल्या पुस्तकातलं वाचायचं अशी तडजोड मी स्वीकारली. हळूहळू The Crucifix Killer मधलं हंटरचं पात्र आणि ते जिवंत करणारं कार्टरचं अप्रतिम लेखन डोक्यात एवढं भिनत गेलं की एकाची दोन, दोनाची चार प्रकरणं करता करता अखेरीस एक दिवस Department Q ला मी रामराम ठोकला आणि Crucifix Killer सलगपणे वाचून संपवलं. Crucifix Killer चं शेवटचं प्रकरण झाल्यानंतर एक जबरदस्त धक्का बसला होता. पुस्तक संपल्यावर येणारी भारावलेपणाची, दिग्मूढ होण्याची अवस्था मी कैक वर्षांनी अनुभवत होतो. काय बोलावं, कसं व्यक्त व्हावं तेच सुचत नव्हतं.
त्यानंतर The Executioner या हंटर मालिकेतल्या दुसऱ्या पुस्तकाला सुरुवात केली. अगदी तोच अनुभव. वाचकाला अक्षरशः जखडून ठेवेल, मोहिनी घालेल अशी सुरूवात, साधी सोपी भाषा, सुटसुटीत संवाद, २-४ मिनिटांत वाचून होईल असं प्रत्येक प्रकरण, प्रत्येक प्रकरणाच्या अखेरीस एक प्रचंड मोठा धक्का. हे धक्के आणि पुस्तकाचा एकूणच वेग एवढा भयंकर आहे की हे एक प्रकरण वाचून झोपू म्हणे म्हणेपर्यंत (मध्य)रात्रीचे १-२ कसे वाजून जात होते हे कळतही नव्हतं. मग मात्र पुढचं पुस्तक सप्ताहांताशिवाय सुरु करायचं नाही असं मी ठरवून टाकलं. अर्थात हा पण काही दिवसच टिकला तो भाग वेगळा.
ख्रिस कार्टरच्या रॉबर्ट हंटर मालिकेतल्या या कादंबऱ्या एवढ्या वेगाने वाचून होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्या वाचायला अतिशय सोप्या आहेत. एकरेषीय आहेत. उगाचंच चार समांतर केसेस चालू नाहीयेत, सामाजिक बडबड नाहीये, वोकिझमच्या कटकटी नाहीयेत, अगदी आवश्यक तेवढी माहिती देण्याव्यतिरिक्त डिटेक्टिव्हजच्या कौटुंबिक भूतकाळाची रडगाणी नाहीयेत. Everything is old school style. Plain simple straight forward! हंटरच्या कादंबऱ्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कादंबरीच्या अगदी सुरुवातीलाच किंवा फार तर पुस्तकाच्या मध्यावर खुनी व्यक्तीची ओळख करून दिली जाते. ती व्यक्ती पूर्णवेळ कथेत वाचकाबरोबर असते. पण वाचकांना शेवटपर्यंत खुनी व्यक्ती हंटरच्या (आणि पर्यायाने वाचकांच्या) आसपास वावरत असते याचा कणमात्रही पत्ता लागत नाही. अजून एक गंमत म्हणजे कथेशी संबंधित असा अजून एक समांतर ट्रॅक चालू असतो. दोन गुन्हे आणि शोध समांतर चालू असतात. हळूहळू पुस्तकाच्या मध्यावर येऊन पोचल्यावर गूढ उलगडायला लागतं. किंवा गूढ उलगतं आहे असा प्रेक्षकांचा निदान समज तरी करून दिला जातो. मात्र अखेरीच्या काही प्रकरणांमध्ये जेव्हा प्रकरण उलगडायला लागतं तेव्हा मात्र वाचकांच्या आश्चर्याला पारावार उरत नाही आणि कार्टरच्या लेखनचातुर्याला वाचक मनोमन दंडवत घालतो.
कार्टरच्या कादंबऱ्या वाचायला सोप्या आहेत पण अजिबात सोप्या नाहीत!!! हंटर मालिकेत एकूण १३ कादंबऱ्या आहेत. प्रत्येक कादंबरीत कार्टर वाचकांना एका नवीन सिरीयल किलरची ओळख करून देतो. प्रत्येक सिरीयल किलर हा आधीच्या कादंबरीतल्या खुन्यापेक्षा अधिक विचित्र, विक्षिप्त, क्रूर आणि विकृत आहे. प्रत्येक पुस्तकात किमान चार ते अनेक हत्या आहेत. प्रत्येक हत्येचं वर्णन अतिशय तपशीलवारपणे करण्यात आलेलं आहे. Everything is very very graphic and extremely disturbing. मी Cody McFadyen आणि Jeff Lindsay (डेक्स्टरवाला) यांच्या पुस्तकांमधली अत्यंत क्रूर आणि विकृत अशा सिरीयल किलर्सची वर्णनं वाचलेली आहेत (त्या दोघांच्या पुस्तकांवर पूर्वी पोस्टसदेखील लिहिल्या आहेत). पण कार्टरच्या प्रत्येक कादंबरीतल्या हत्या, छळ, क्रौर्य यांची वर्णनं आणि कार्टरची कल्पनाशक्ती एवढी भयंकर नेक्स्ट लेव्हल आहे की आपल्या हातात असलेलं पुस्तक वाचत असताना यापेक्षा वाईट काही असूच शकत नाही असं आपल्याला सारखं वाटत राहतं. मात्र पुढच्याच कादंबरीत कार्टर आधीच्या कादंबरीपेक्षाही अघोरी आणि भयानक अशा खुनांची तपशीलवार वर्णनं करून आपल्याला भयंकर धक्का देतो.
यापूर्वी वाचलेल्या अनेक सिरीयल किलर्सच्या कथांमध्ये सिरीयल किलर विनाकारण मारत असतो असं आपण वाचलेलं असतं. उदाहरणार्थ ब्लॉन्ड किंवा चष्मा असलेले किंवा चायनीज वंशाचे किंवा अमुक एक व्यापारात गुंतलेले असे काहीही निकष लावून सिरीयल किलर त्यांना आपलं लक्ष्य बनवत असतो. मात्र हंटर मालिकेत (एखाद-दोन कादंबऱ्यांचे अपवाद वगळता) असं काही एक नाहीये. प्रत्येक कादंबरीतली कारणं अतिशय वेगळी आहेत. भूतकाळाशी, भूतकाळातल्या काही घटनांशी संबंधित आहेत आणि त्यामुळेच वाचक त्या सिरीयल किलरशी अगदी तादात्म्य पावतो. को-रिलेट करू शकतो. कधीकधी तर ही भावना एवढी टोकाला जाऊन पोहोचते की वाचकाच्या मनात सिरीयल किलरबद्दल अक्षरशः सहानुभूतीही निर्माण होते.
डिटेक्टिव्ह रॉबर्ट हंटर आणि डिटेक्टिव्ह कार्लोस गार्सिया हे लॉस अँजलस पोलीस खात्यातल्या RHD अर्थात रॉबरी हॉमिसाईड डिव्हिजन,मधल्या HSS UVC अर्थात हॉमिसाईड स्पेशल सेक्शन अल्ट्रा व्हायोलंट क्राईम्स विभागात काम करणारे स्पेशल डिटेक्टिव्हज आहेत. लॉस अँजलस काऊंटी आणि आजूबाजूच्या परिसरातील अत्यंत विकृत, क्रूर हत्या आणि सिरीयल किलर्सनी केलेली हत्याकांडं रोखणं, त्यांना पकडणं ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. रॉबर्ट हंटर हा गिफ्टेड कीड आहे. याच्या तीव्र बुद्धिमत्तेमुळे अल्पवयातच त्याने शाळा आणि कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण करून वयाच्या तेविसाव्या वर्षीच Criminal Behavior Analysis and Biopsychology या विषयात पीएचडी मिळवलेली आहे. त्याच्या पीएचडी थिसीसचा पेपर इतका प्रभावी आणि माहितीपूर्ण आहे की एफबीआय च्या क्वांटिको अकॅडमीमधल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला तो पेपर वाचणं बंधनकारक आहे.
हंटरचं व्यक्तिमत्व फार वेगळं असं नसलं तरी इंटरेस्टिंग आहे. तो काही वेळा हजरजबाबी आहे तर काही वेळा तितकाच शांतपणे ऐकून घेणारा मिश्किल नायक आहे. एकदा त्यांची कॅप्टन एका केसच्या संदर्भात त्याच्यावर आणि गार्सियावर चिडलेली असते. पण प्रत्यक्षात मात्र त्यांची काही एक चूक नसते. कारण त्या घटनेबद्दल त्या दोघांना काही माहितीही नसते. त्यावेळी हंटर अजिबात न रागावता अत्यंत मिश्कीलपणे कॅप्टनला म्हणतो की "Are you sure you’re yelling at the right detectives, captain?"
हंटरची व्यावसायिक कारकीर्द जेवढी आकर्षक आहे तितकंच त्याचं व्यक्तिगत आयुष्य अंधःकारमय आहे. त्याच्या बालपणी त्याच्या आईचं कर्करोगाने निधन झालेलं असल्याने तेव्हापासून हंटरला निद्रानाशाचा विकार जडलेला आहे. काही वर्षांनी त्याचा निद्रानाशाचा विकार बराही होतो. पण अर्थात फार थोड्या काळासाठीच. हंटरला पीएचडी मिळाल्यानंतर काही आठवड्यांतच त्याच्या वडिलांची हत्या होते. आणि त्यानंतर त्याचा निद्रानाशाचा विकार पुन्हा डोकं वर काढतो. आणि त्यानंतर LAPD च्या UVC विभागात कामाला लागल्यानंतर रोजच्या रोज येणाऱ्या हत्या, सिरीयल किलर्सचं क्रौर्य यांचे अनुभव घेतल्यानंतर तर हा निद्रानाशाचा विकार अधिकच बळावत जातो. मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, अंतर्गत राजकारणाकडे लक्ष न देता हंटर आपलं काम अत्यंत मनापासून करत असतो.
हंटरच्या फार अशा काही आवडीनिवडी नाहीत. त्याला सिंगल माल्ट व्हिस्की मात्र अतिशय प्रिय आहे. पण तेवढी एकच आवड सोडली तर त्याच्या इतर काही आवडीनिवडी नाहीत. त्याला बायको नाही, प्रेयसी नाही. कामाचं स्वरूप, विचित्र वेळा यामुळे त्याला पार्टनरसाठी वेळी नाही. त्याचं घर अतिशय छोटं आहे, घरात फारच निवडक असं फर्निचर आहे. त्याची गाडीही अगदी साधी आहे. थोडक्यात अमेरिकी जीवनशैलीला न शोभणारा असा हा LAPD चा डिटेक्टिव्ह आहे.
हंटरचं एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत उत्तम आणि वेगवान वाचक आहे. गुन्हेगार, खुनी, गुन्ह्यांच्या पद्धती, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र, वाहनांचे प्रकार, हत्यारं, बंदुका, रोगांचे प्रकार, जगभरातल्या विविध संस्कृतींमधल्या चिन्हांचा आणि प्रतीकांचा वापर अशा कुठल्याही विषयावरच्या चर्चेत हंटर एखाद्या तज्ज्ञ अभ्यासकाप्रमाणे सहभागी होऊन आपलं मत मांडू शकत असतो. तो निरनिराळ्या प्रकारचं वाचन तर करतोच पण त्याच्या वाचनाचा वेग हा सामान्य वाचकाच्या वाचनाच्या वेगापेक्षा किमान तीन ते पाचपट अधिक आहे. अनेकदा पुरावे म्हणून मिळालेल्या सिरीयल किलर्सच्या डायऱ्या वाचताना याचा प्रत्यय येतो. आणि या वेगवान वाचनामुळे त्याने अनेकदा निर्दोष व्यक्तींचे प्राणही वाचवलेले आहेत. थोडक्यात नायक म्हणून अगदी आदर्श वाटावा असा हा डिटेक्टिव्ह हंटर आहे.
हंटरला जन्माला घालणारा त्याचा मानसपिता अर्थात ख्रिस कार्टर हे ही फार सुरस असं व्यक्तिमत्व आहे. कार्टरचा जन्म ब्राझीलमधला असून त्याने वयाच्या सतराव्या वर्षी मिशिगन स्टेट विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्याने psychology आणि criminal behaviour चा अभ्यास केला. त्या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर कार्टरने मिशिगन राज्याच्या डिस्ट्रिक्ट ऍटर्नी कार्यालयात Criminal Psychology विभागात नोकरी पत्करली. काही वर्षं तिथे काम केल्यानंतर ती नोकरी सोडून तो लॉस अँजलसमध्ये आला आणि एलेमध्ये त्याने संगीत क्षेत्रातल्या आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. विविध बँड्समध्ये दहा वर्षं गिटारिस्ट म्हणून काम केल्यानंतर तो लेखनाकडे वळला. गंमत म्हणजे त्याला लेखनाची आवड होती किंवा लहानपणापासूनच त्याचं लेखक होण्याचं स्वप्न होतं असा काहीही भाग नव्हता. तोवर त्याने एखादी साधी लघुकथाही लिहिलेली नव्हती. परंतु अचानकपणे द क्रूसिफिक्स किलरची कथा त्याच्या डोक्यात आली आणि त्यानंतर त्याने त्या कथेचा मसुदा लिहून काढला. काही मित्रांना तो आवडला. अखेरीस काही सुधारणा करत त्याने पूर्ण लांबीची कादंबरी लिहून काढली. आणि त्यानंतर मात्र त्याने मागे वळून बघितलंच नाही.
एक गंमतीशीर निरीक्षण म्हणजे ख्रिस कार्टर लंडनमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्याने रॉबर्ट हंटर मालिकेच्या लेखनाला सुरुवात केली असल्याने, मालिका, प्रसंग अमेरिकेत घडत असले तरी अनेकदा पात्रांच्या तोंडचे शब्द, भाषाशैली ही मात्र ब्रिटिश पद्धतीची आहे. उदाहरणार्थ कित्येकदा कॉप्स च्या जागी पोलीस, ट्रंक (डिकी) च्या जागी बूट, डस्टबिन च्या जागी वेस्ट पेपर बास्केट, ऑटोप्सी च्या जागी पोस्ट मॉर्टम, एलेव्हेटर च्या जागी लिफ्ट, अपार्टमेंट च्या जागी फ्लॅट, एसी च्या जागी एअरकॉन असे अनेक ब्रिटिश शब्द अमेरिकी डिटेक्टिव्हच्या तोंडी थोडे वेगळे वाटतात.
कार्टरने पोलीस डिपार्टमेंट, संगीत आणि लेखन अशा सर्वस्वी भिन्न अशा क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करताना त्याला आलेले निरनिराळे अनुभव काही मुलाखतींमध्ये सांगून ठेवले आहेत. त्याला हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "तू एवढं क्रूर, भयानक, विकृत कसं लिहू शकतोस?". त्यावर तो प्रामाणिकपणे सांगतो की त्याच्या लेखनात क्रौर्य आहे याची त्याला खरंच कल्पना नव्हती कारण त्याचं वाचन अतिशय मर्यादित आहे. त्याच्या लेखनातील विकृततेविषयी वाचकांकडून वारंवार प्रश्न यायला लागल्यावर त्याने काही लोकप्रिय गुन्हेगारी विषयक लेखन करणाऱ्या लेखकांची पुस्तकं आणून वाचली आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की वाचक आपल्या लेखनाविषयी जे मत व्यक्त करतायत ते अगदीच काही चुकीचं नाहीये. परंतु त्याच्या मते त्याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे. गुन्हेगारी विषयावर लिहिणाऱ्या इतर लेखकांची गुन्ह्याची, हत्यांची वर्णनं ही बातम्या, पोलीस अहवाल यांवर आधारित असतात. मात्र कार्टरने लिहिलेली वर्णनं ही तो पोलीस डिपार्ट्मेंटमध्ये नोकरीला असताना त्याने ज्या असंख्य गुन्ह्यांवर काम केलं आहे, ज्या अनेक रक्तरंजित घटना बघिल्या, अनुभवल्या आहेत त्यावर आधारित आहेत. किंबहुना त्याचं म्हणणं तर असं आहे की त्याने प्रत्यक्षात ज्या अतिशय विकृत घटना बघिल्या आहेत त्या तो अतिशय सौम्य करून लिहितो आहे. युट्युबवर त्याच्या दोन मुलाखती आहेत. त्यात त्याने आपण वाचू काय कल्पनाही करू शकणार नाही अशा गुन्ह्यांचे त्याने घेतलेले अनुभव कथन केले आहेत. ते ऐकल्यावर मात्र खरंच त्याने केलेली वर्णनं सौम्य वाटायला लागतात हे निश्चित.
ख्रिस कार्टरच्या रॉबर्ट हंटर मालिकेत एकूण १३ पुस्तकं आहेत.
1 The Crucifix Killer
2 The Executioner
3 The Night Stalker
4 The Death Sculptor
5 One by One
6 An Evil Mind
7 I Am Death
8 The Caller
9 Gallery of the Dead
10 Hunting Evil
11 Written in Blood
12 Genesis
13 The Death Watcher
या प्रत्येक कादंबरीतला सिरीयल किलर अधिकाधिक अघोरी प्रकार वापरून आपल्या बळीला ठार करत असतो. एका कादंबरीतला सिरीयल किलर एका व्यक्तीला मासा पकडण्याच्या मोठ्या हुकला टांगून ठेवून लटकवून मारतो तर दुसऱ्या एका कादंबरीतला सिरीयल किलर आपल्या बळीला मारून त्याचे तुकडे तुकडे करून ते रचून ठेवत असतो. एक किलर एखाद्याला व्हिडीओ कॉल करून त्याच्या जवळच्या व्यक्तीला त्याच्यासमोर हालहाल करून ठार करत असतो तर एक खुनी इंटरनेटवर खुनाचं थेट प्रक्षेपण करत असतो. एक खुनी प्रत्येक प्रेताच्या शरीरात एक वस्तू ठेवत असतो तर दुसरा एक खुनी ज्याचा खून करायचा त्याला ज्याची भीती वाटते ती गोष्ट वापरून खून करत असतो. एक कादंबरी तर सत्य घटनेवर असून ती दोन भागांमध्ये विभागलेली आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा निरनिराळ्या प्रकारच्या हत्या या तेरा कादंबऱ्यांमध्ये वाचायला मिळतात. खून, रक्तपात, अघोरी, किळसवाणी वर्णनं यांचं वावडं असणाऱ्यांनी कार्टरच्या वाट्याला न गेलेलंच बरं. पण ज्यांना गुंतागुंत, गुन्हेगारांची विकृत मानसिकता, गुन्हेगारांचं मानसशास्त्र याविषयी वाचायला आवडतं, ज्यांना डेक्स्टर वाचायला आणि बघायला आवडला होता, ज्यांना माईंडहंटर मालिका आवडली होती त्यांना मात्र या कादंबऱ्या खात्रीशीरपणे आवडतील.
२००९ मध्ये Crucifix Killer प्रकाशित झाल्यानंतर सातत्याने लेखन करत सोळा वर्षांत तेरा कादंबऱ्या लिहिणाऱ्या आणि आत्तापर्यंत जगभरात जवळपास ४० लाखांच्या वर पुस्तकांची विक्री झालेल्या ख्रिस कार्टरच्या या रॉबर्ट हंटर मालिकेवर अद्यापपर्यंत एकही चित्रपट, टीव्हीमालिका, वेबसिरीज यापैकी काहीही प्रदर्शित कसं झालं नाही याचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटतं. लवकरच एखाद्या स्टुडिओचं, एखाद्या प्रॉडक्शन हाऊसचं लक्ष या दर्जेदार डिटेक्टिव्ह मालिकेकडे जावो आणि रॉबर्ट हंटर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचो हीच सदिच्छा
--हेरंब ओक










